1

Topic: हायड्रोजन संपत कसा नाही?

सतत अगणित तारे प्रसवणाऱ्या ब्रह्मांडातील हायड्रोजन संपत का नाही? 'स्थिर- स्थिति' सिद्धांताच्या बाबतीत तर हा प्रश्न अधिक तीव्रतेने विचारता येईल...

2

Re: हायड्रोजन संपत कसा नाही?

ताऱ्यांच्या निर्मितीचा वेग अगणित नक्कीच नाही. हा वेग कालानुरूप कमी होत आहे. दीर्घिकांतल्या आंतरतारकीय हायड्रोजन वायुचं प्रमाण ताऱ्यांच्या निर्मितीमुळे निश्चितच कमी होत आहे. याचा परिणाम ताऱ्यांच्या निर्मितीवर निश्चितच होतो आहे. आपल्या आकाशगंगेच्या जन्मानंतर सुरूवाचीच्या काळात ताऱ्यांची निर्मिती अधिक जोमाने चालू होती. आज या निर्मितीचा वेग नक्कीच कमी झाला आहे. किंबहुना आपली आकाशगंगा ही तारूण्यातून वृद्धत्वाला सामोरं जाण्याच्या तयारीत असल्याचं मानलं जातं. सर्व दीर्घिकांच्या बाबतीत हे होणे अपेक्षित आहे. दीर्घिकांत तारे निर्माण होण्याची क्रिया ही दीर्घिकेत पुरेसा वायू शिल्लक असेपर्यंतच चालू राहणार आहे.

या दृष्टीने आपल्याला आकाशगंगेच्या बाबतीत एक साधं गणित करता येईल. आजच्या घडीला आपल्या आकाशगंगेत प्रत्येक वर्षी सरासरी सुमारे सात तारे जन्माला येतात असं मानलं जातं. (या संख्या वेगवेगळ्या संशोधकांच्या मते काही प्रमाणात वेगळ्या असू शकतात.) आपल्या आकाशगंगेत चारशे अब्ज तारे असावेत. आता आकाशगंगेच्या जन्मापासून जर सुरूवातीपासून प्रत्येक वर्षाला सात याच वेगाने सतत ताऱ्यांची निर्मिती होत राहिली तर इतके तारे निर्माण होण्यासाठी जवळ जवळ साठ अब्ज वर्ष लागली असती. परंतु आपल्या आकाशगंगेचं वय हे दहा अब्ज वर्ष इतकंच आहे. याचाच अर्थ आपल्या आकाशगंगेच्या जन्मानंतरच्या सुरूवातीच्या काळात ताऱ्यांची निर्मिती ही अधिक वेगाने होत होती हे उघडच आहे.

3

Re: हायड्रोजन संपत कसा नाही?

चांगला प्रश्न विचारल्याबद्दल संतोष यांचे अभिनंदन...

4

Re: हायड्रोजन संपत कसा नाही?

धन्यवाद वामन. धन्यवाद राजीव. आपले उत्तर खुप आवडले. आणि सहाजिकच हे उत्तर नेहमीप्रमाणे अनेक नव्या प्रश्नाना जन्म देणारे आहे.
त्यापैकी काही प्रश्न असे की,
१) हायड्रोजन संपल्यावर दीर्घिका मृत समजायची का?
२) अश्या मृत दीर्घिका अस्तित्वात आहेत का?
३) आपल्या प्रो.जयंत नारळीकरांनी नुकतेच LMC  मधले २० अब्ज वर्षां पूर्वीचे तारे शोधल्याचा दावा केला आहे. मग आता LMC अजूनही नवे तारे प्रसवते का? आणि अश्या जुन्या होत जाणाऱ्या दिर्घिकांत जड मूलद्रव्ये अधिक असायला हवीत. असे काही पुरावे मिळतात  का?
४) यामुळे, एकंदरीतच विश्वाचा प्रवास 'वायुपासून घना कडे' असा असायला हवा. तो आहे का?

5

Re: हायड्रोजन संपत कसा नाही?

१) दीर्घिकेतील आंतरतारकीय वायुचा साठा संपला की ताऱ्यांची निर्मिती थांबते. अशा दीर्घिकेला मृत दीर्घिका म्हणता येईल. अशा दीर्घिकांत वृद्ध ताऱ्यांची संख्या अधिक असते. यातील अनेक तारे हे लाल राक्षसी ताऱ्यांच्या स्वरूपात असल्याने अशी दीर्घिकांना लालसर रंग प्राप्त झालेला असतो.

२) अनेक लंबवर्तुळाकृती दीर्घिका या वृद्ध ताऱ्यांनी भरलेल्या असून त्या या अंतिम स्थितीत असण्याची किंवा अंतिम स्थितिच्या जवळ आल्याची सर्वसाधारण शक्यता व्यक्त केली गेली आहे. अशा दीर्घिका प्रचंड आकाराच्या असल्या तर यात जड मूलद्रव्यांचं प्रमाण अधिक असू शकतं. कारण यातील तारे हे वजनदार असण्याची शक्यता असते. असे तारे मृत्यु पावताना होणाऱ्या प्रचंड स्फोटात जड मूलद्रव्यांची निर्मिती होते. त्यामुळे ताऱ्यांच्या पुढील पिढीत जड मूलद्रव्यांचं प्रमाण अधिक असतं. मात्र लहान आकाराच्या दीर्घिकांत या उलट परिस्थिती असू शकते.

३) प्रा. जयंत नारळीकरांच्या नावे २० अब्ज वर्षांपूर्वीचे तारे सापडल्याची बातमी काही वृत्तपत्रांतून आली आहे. प्रा. नारळीकरांनी असे अतिशय महत्वाचे निष्कर्ष काढले असले तर ते शोधनिबंधाच्या स्वरूपात नेचर किंवा तत्सम एखाद्या जगन्मान्य नियतकालिकात निश्चितच प्रसिद्ध झाले असले पाहिजेत. अशा प्रकारचा संदर्भ (वर्तमानपत्रातील बातमी नव्हे!) आपल्याला सापडला असल्यास कृपया कळवावे.

४) आपल्या शेवटच्या प्रश्नाचे उत्तर हे विश्व अंतिम स्थितीत आकुंचन पावते का प्रसरण पावते यावर अवलंबून असेल.

6

Re: हायड्रोजन संपत कसा नाही?

@ राजीव, आपल्या उत्तरानी समाधान झाले.
प्रा. जयंत नारळीकरांनी मागच्या वर्षी आपल्या मुंबईच्या नेहरु सेण्टर येथे जे या सम्बंधित व्याख्यान दिले होते, त्याला मी उपस्थित होतो. पण अत्ता या क्षणी माझ्याकडे त्या संदर्भात काही कागद पत्र नाहित. त्यांनी यावर अनेक शंकांचे समाधानही केले.
त्या नंतरच काही दिवसांनी माझ्या मनात वरील शंका उपस्थित झाल्या.
ता. क.       प्रा. जयंत नारळीकरांनी पुराव्या दाखल काही उत्तम पारदर्शिका दाखवल्या होत्या. LMC च्या बाहेरील बाजूकडे त्यांनी आपले लक्ष केन्द्रित केले होते. तेथे त्यांना हे खुजे तारे आढलून आले. या निमित्ताने या मच्न्चावर या विषयी चर्चा झाली तर फारच उत्तम. माझी आपल्याला विनंती आहे की, आपल्या सारख्या तदन्य लोकानी या बद्दल अजून माहिती उजेडात आणावी. मी ही प्रयत्न करेन पुरावे शोधण्याचा, पण मी या विषयातला तदन्य नसल्याने माझ्या शोधाला मर्यादा आहेत.

7

Re: हायड्रोजन संपत कसा नाही?

आपण जो २० अब्ज वर्षे वयाच्या ताऱ्यांचा उल्लेख केला आहे तो मीसुद्धा वर्तमानपत्रातून वाचला आहे. मलाही प्रा. नारळीकरांनी व्यक्त केलेल्या या मताबद्दल उत्सुकता आहे. वर्तमानपत्रातील माहिती ही अनेकदा अपुऱ्या व अर्धवट स्वरूपात छापलेली असू शकते. त्यामुळे मीही या विषयावरील अधिकृत माहितीच्या शोधात आहे. ही अधिकृत माहिती मिळताच मी आपल्याला ती या विज्ञानपीठाद्वारे नक्कीच कळवीन.