1

Topic: लुप्त होणारी मराठी भाषा

आपण उच्चशिक्षणासाठी प्रामुख्याणे इंग्रजीचा वापर करतो. त्यामुळे मराठिमध्ये तांत्रिक शब्दांची भर पडत नाही. याचापरिणाम म्हणुन तंत्रज्ञानाच्या प्रगती बरोबर मराठी भाषा वापरणे अवघड होत चालले आहे. तसेच संगणकामध्ये मराठी टंकलेखनात येणारया अडचणी हे ही एक कारण आहे. असेच होत राहिले तर कालांतराने मराठी भाषा लुप्त होइल. असे होउ नये म्हणुन मविप काही उपक्रम राबवत आहे का? असल्यास थोडी माहिती द्यावी. तसेच इतर काही उपाय असतील तर त्यांची चर्चाही इथे होउ शकते....

2

Re: लुप्त होणारी मराठी भाषा

आपण आपल्या लिखाणातून काही मुद्दे मांडले आहेत. अशाच प्रकारचे विचार अनेकांच्या मनात येण्याची शक्यता आहे. त्यावर काही भाष्य करणं गरजेचं वाटलं, म्हणून हे लिहित आहे.

(१) मराठीमध्ये तांत्रिक शब्दांची भर पडत नाही हे आपलं म्हणणं योग्य नव्हे. किंबहूना अनेक इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द आहेत. अशा शब्दांची यादी परिषदेच्या याच संकतेस्थळावरील पहिल्या पानावरील ‘मराठी प्रतिशब्द’ या जोडणीद्वारे दिली आहे. तसेच नव्या शब्दांनाही हळु हळु प्रतिशब्द निर्माण होतही आहेत. मात्र अशा प्रकारचे प्रतिशब्द निर्माण करण्यात आणि या नव्या प्रतिशब्दांचा वापर करण्यात आपण प्रत्येकानेच पुढाकार घेण्याची गरज आहे. यातील सोपे-सुलभ शब्द कालौघात टिकून राहातील, बाकीचे नष्ट होतील.

आता प्रश्न एकच आहे की अस्तित्वात असलेल्या शब्दांचाही किती उपयोग केला जातो? उच्च शिक्षणासाठी वापरल्या जाणार्‌या मराठीत राहू द्या, पण नेहमीच्या मराठीतील अस्तित्वात असणार्‌या प्रतिशब्दांचा वापर मराठीत बोलताना किती जण करतात? साधं उदाहरण द्यायचं तर – वीजप्रवाह खंडीत झाल्यावर ‘दिवे गेले’ हे सहजपणे सांगता येत असतानाही ‘लाईट गेले’ असे म्हणणे किंवा संगणकाला कंप्युटर, संगणकाच्या पडद्याला स्क्रीन अशी भाषा वापरली जाते. एक सांगा, जर आपण जसं सहजपणे इंग्रजी शब्दांचा वापर मराठीतून बोलताना करतो, तसा मराठी शब्दांचा वापर इंग्रजी बोलताना करतो का? अशी मराठी मिश्रित इंग्रजी भाषा एखाद्या अमराठी व्यक्तीसमोर आपण बोलू का? मराठी बोलताना केला जाणारा इंग्रजी शब्दांचा वापर हा आपण आपल्यावर स्वतःहून लादून घेतला आहे – इंग्रजांनी किंवा इतर कोणी आपल्यावर लादलेला नाही. हे लक्षात घ्या की प्रा. जयंत नारळीकरांसारखे अनेक विख्यात मराठी वैज्ञानिक – ज्यांनी उभं आयुष्य संशोधनासाठी वेचलं आहे आणि ज्यांचा पदोपदी परदेशी वैज्ञानिकांशी (आणि पर्यायाने इंग्रजी भाषेशी) संबंध येतो – ते इंग्रजी शब्दांचा आधार न घेता, शुद्ध मराठीतून आपले विज्ञानावर आधारलेले विचार स्पष्टपणे मांडू शकतात. तात्पर्य, आपल्यालाच मराठी भाषेचा वापर करण्याची इच्छा नाही आणि म्हणूनच आपण या वैज्ञानिक मराठीपासून दूर जात आहोत.

(२) मराठी टंकलेखन करण्यास येणार्‌या अडचणींचा उल्लेख आपण केला आहे. आपल्याला इंग्रजी भाषेपेक्षा मराठीतून टंकलेखन करण्यापेक्षा सोपे वाटते. हाच प्रश्न एखाद्या जपानी, चिनी किंवा जर्मन, फ्रेंच भाषिकांना विचारा. त्याना काय त्यांच्या स्वतःच्या भाषेपेक्षा इंग्रजी भाषा टंकलेखनासाठी सोपी वाटेल? आपल्याला मराठीतील टंकलेखन अवघड वाटण्याची कारणे दोन – एक म्हणजे आपण संगणकाचे धडे गिरवले ते इंग्रजीतून – मराठीतून नव्हे. दुसरे कारण म्हणज आपण मराठी भाषेत टंकलेखन करण्यासाठी प्रयत्नच केलेला नसतो. आज टंकलेखनासाठी उच्चारावर आधारित अशा अनेक सोप्या पद्धती उपलब्ध आहेत. (यातील काही पद्धतिंचा उल्लेख या संकेतस्थळावरही केला आहे.) अशा पद्धतींचा वापर किती जण करतात? यांचा वापर सहजपणे करता येईल. फक्त या पद्धती जाणून घेण्यासाठी थोडेसे परिश्रम घेण्याची आवश्यकता आहे. आणि यापुढे जाऊन असेही विचारता येईल. या पद्धती जर अधिक सोप्या करायच्या तर त्या करणार कोण? आपल्या सर्वांपैकीच कोणी तरी.... त्यामुळे आपल्यापैकीच जे कोणी संगणक तज्ज्ञ असतिल व या प्रश्नाबद्दल ज्यांना आस्था असेल, त्यांनी यादृष्टीने गंभीरपणे प्रयत्न करण्यास हवा.

(३) मराठी भाषा लुप्त होऊ नये म्हणून मराठी विज्ञान परिषद करीत असलेल्या उपायाबद्दल आपण विचारणा केली आहे. मराठी भाषेतून विज्ञान प्रसार हे मराठी विज्ञान परिषदेचे एक उद्दिष्टच आहे. मराठी भाषेच्या संवर्धनाच्या दृष्टीनेही उपयुक्त ठरणारे परिषदेचे हे कार्य चार दशकांहून अधिक काळ अव्याहतपणे चालू आहे.

आता या तिसऱ्या मुद्द्यावर थोडंसं आणखी मतप्रदर्शन – मराठी भाषेबद्दल आपण व्यक्त केलेल्या भितीला जबाबदार कोण आहे? मराठी भाषिकच ना? आपल्या मुलाशी फक्त इंग्रजीतून संभाषण करणारे तसंच आपल्या मुलाला मराठी वाचता येत नाही किंवा वाचायला आवडत नाही हे अभिमानाने सांगणारे पालक हेच मराठी भाषेचे विरोधक (खरं तर मारेकरी) नव्हेत काय? दुसरी गोष्ट म्हणजे मराठी विज्ञान परिषदेने हे कार्य करावे अशी अपेक्षा करताना हे ही कृपया लक्षांत घ्यावे की मराठी विज्ञान परिषदेचे कार्य परिषदेच्या ज्या सुमारे सत्तर विभागांतील कार्यकर्त्यांद्वारे पार पडते, ते कार्यकर्ते कोण आहेत? हे सर्व तुमच्या आमच्यापैकीच काहीजण आहेत. त्यामुळे मराठीतून विज्ञान प्रसाराचे कार्य अधिक जोमाने करायचे असेल तर त्यात आपल्यासारख्यांच्या सहभागाचीही अत्यंत आवश्यकता आहे. स्पष्टंच बोलायचं तर ती फक्त परिषदेचीच नव्हे तर आपलीही जबाबदारी आहे.

3

Re: लुप्त होणारी मराठी भाषा

आपले भाष्य वाचून छान वाटले. फक्त काही मुद्दे स्पष्ट करावेसे वाटतात.

आपला पहिला मुद्दा अगदी योग्य आहे. बरयाच वेळा काही शब्दांचे प्रतिशब्द आठवत नाहित. यावर मी वैयक्तिक पातळिवर उपाय शोधण्याचा मी प्रयत्न करत आहे, पण इथे थोडे मार्गदर्शन मिळाले तर बरे होइल.

मराठी टंकलेखनात मानसिकतेबरोबर आणखी एक समस्या म्हणजे संगणकावरील कळसंचाची रचना. ती मराठी किंवा भारतीय भाषांसाठी योग्य अशी करण्यासाठी प्रयत्न गरजेचे आहेत.(जपानी, चिनी कळसंच त्याप्रमाणे बनलेले असतात)

तुम्ही जो तिसरा मुद्दा मांडला तो पण अगदि योग्य आहे आणि मराठी विज्ञान परिषदेच्या उपयुक्ततेबद्दल मला जराही शंका नाही. याचे मुख्य कारण म्हणजे मी काही काळ मविप च्या गडहिंग्लज विभागात काम केले आहे(फार कमी कालावधिसाठी) आणि सध्या जरी मला ते शक्य नसले तरी मी पुन्हा मविपशी जोडला जाइन याची मला खात्री आहे. पण मविपकडून अपेक्षा करण्याचे मुख्य कारण म्हणजे मविप अनेकांपर्यंत एकाचवेळी पोहोचू शकते. वैयक्तिक पातळिवर तर प्रयत्न चालुच राहतील पण अशा संस्था आज आशेचा मुख्य स्त्रोत आहेत.

आणखी एक सुचना आहे, तशी अंमलात आणायला कठिण आहे पण आली तर चांगले होइल. ती म्हणजे, पत्रिकेच्या सभासदत्वासाठीचे पैसे ई-बँकिंगने देण्याची सुविधा.

धन्यवाद.

4

Re: लुप्त होणारी मराठी भाषा

या संकेतस्थळावर दिलेली शब्द-प्रतिशब्दांची यादी अधिकाधिक अद्ययावत करण्याचा परिषदेचा प्रयत्न राहणार आहे. काही प्रतिशब्द वेळेवर आठवत नाहीत असे आपण म्हटले आहे. या बाबतीत थोडेसे अधिक विवेचन करण्याची गरज वाटते.

आपण प्रत्येक इंग्रजी शब्दाला एकाच शब्दात बसवण्याचा प्रयत्न करतो. यासाठी आपण काही वेळा कठीण संस्कृत शब्दांचा आधार घेतो. असे शब्द अनेक वेळा लक्षांत राहात नाहीत. पण प्रत्येक वेळी अशा कठीण वा न रूजलेल्या शब्दांचा वापर करण्याची गरज असतेच असे नाही. कारण अशा वापरामुळे इंग्रजीचे मराठीत केले गेलेले रूपांतर हे क्लिष्ट होण्याची शक्यता असते. उदाहरणार्थ, This process is affected by temperature या वाक्याचे मराठी रूपांतर करताना ‘ही प्रक्रिया तापमानामुळे बाधित होते’ असे क्लिष्ट रूपांतर करण्यापेक्षा ‘या प्रक्रियेवर तापमानाचा परिणाम होतो’ असे सहज-सुलभ वाक्य वापरणे जास्त योग्य वाटते. दुसरी गोष्ट - मराठीत लिहिताना क्लिष्ट शब्दांचा वापर करण्यापेक्षा मूळ इंग्रजी शब्दाची फोड ही नेहमीच्या वापरातील दोन-तीन मराठी शब्दांत करण्यास काय हरकत आहे? त्यामुळे वाक्याचा अर्थही सहजपणे समजू शकेल. क्लिष्ट शब्दांच्या वापरामुळे वाचकाचे वाचनावरून लक्ष उडण्याचीच शक्यता जास्त. तसेच एखाद्या शब्दाला दोन किंवा अधिक प्रतिशब्द अस्तित्वात असण्यासही हरकत नाही. यानेच भाषा समृद्ध होते. फक्त इतकंच की यापैकी प्रत्येक शब्दावरून त्याचा अभिप्रेत असलेला वैज्ञानिक अर्थ स्पष्ट व्हायला हवा. त्याचे दोन अर्थ निर्माण होऊन वाचकाचा गोंधळ उडता कामा नये.

पुढील मुद्‌दा कळसंचांचा. लोकांकडूनच अशा कळसंचाची मागणी झाल्यास मराठी अक्षरांचा वापर केलेले कळसंच बाजारात सहजपणे उपलब्ध होऊ शकतील. खरं तर अशा कळसंचांच्या बाबतीत त्यांच्या अंतर्गत रचनेत बदल करण्याची काहीच गरज असणार नाही. फक्त कळसंचावर इंग्रजी अक्षरांऐवजी मराठी अक्षरे छापावी लागतील. इंग्रजी व अरबी अशी दोन्ही मुळाक्षरे असलेले कळसंच पाहिल्याचे मला स्मरते. अशाच प्रकारचे द्विभाषिक कळसंचही मराठी भाषेसाठीही तयार करता येतील. मात्र अशा कळसंचांना बाजारात पुरेशी मागणी असणे गरजेचं आहे. अशी गरज निर्माण करण्याची जबाबदारी अर्थातच आपली सर्वांची आहे.

आपण परिषदेसाठी काही काळ काम केले आहे. त्यामुळे परिषदेचे कार्यस्वरूप आपल्याला परिचित आहेच. भविष्यात पुनः आपण परिषदेच्या कार्यात सक्रिय भाग घेणार आहात हे वाचून आनंद वाटला. आपल्याला परिषदेच्या कार्यात लवकरात लवकरात सहभाग होता यावे यासाठी शुभेच्छा.

आपण आपल्या शेवटच्या परिच्छेदात पत्रिकेची वर्गणी भरण्यासाठी ई-बँकींगची सोय उपलब्ध करून देण्यासंबंधी सूचना केली आहे. अशी सोय परिषदेने पूर्वीच उपलब्ध करून दिली आहे. आपण कोणत्या बँकेत व कोणत्या खाते क्रमांकावर आपली वर्गणी भरावी याबद्दलची माहिती आपल्याला परिषदेच्या मध्यवर्ती कार्यालयात दूरध्वनी केल्यास त्वरीत मिळू शकेल. सदर बँकेत पैसे भरताच तसे ई-मेल आपण परिषदेकडे पाठवावे. परिषदेचे दूरध्वनी क्रमांक व ई-पत्ता याच संकेतस्थळाच्या 'संपर्क' या पृष्ठावर उपलब्ध आहेत.

5

Re: लुप्त होणारी मराठी भाषा

तुम्ही सुचवलेल्या उपायाबद्दल धन्यवाद. तो खुप तर्कसंगत वाटतो. आणखी एक वाखाणण्याजोगी गोष्ट म्हणजे तुम्ही खुप लवकर शंकानिरसन करता, त्याबद्दलही धन्यवाद. मी या उपायाची अंमलबजावनी नक्कीच करेन. आणि मी लवकरात लवकर मविपमध्ये परतण्याचा प्रयत्न ही करेन. तोपर्यंत या संकेतस्थळाच्या माध्यमातुन संपर्कात राहुच. पुन्हा एकदा धन्यवाद.

6

Re: लुप्त होणारी मराठी भाषा

For  the Students coming fro Semi-english or English Medium, it is going to be  more
   difficuilt to express in good Marthi.
   It may be Medicine, Pharmacy, Biotechnology, Engineering , Law, Administration,  computer   
   etc. The Practical Tactics & Remedies suggesed are highly appriciated by my students.
   Thank you .  Prof. B B Inamdar

7

Re: लुप्त होणारी मराठी भाषा

वरील ई-पत्रव्यवहारात केलेल्या सूचनांचे आपल्या विद्यार्थ्यांकडून स्वागत केले जात आहे हे वाचून आनंद झाला.
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार.

8

Re: लुप्त होणारी मराठी भाषा

प्रो. इनाम्दारांनी व्यक्त केलेले विचार खरे आहेत, पण दुर्दैवी आहेत. हे होणारच होते. असे झाल्याने मराठीचे आणि पर्यायाने आपणा सर्वांचे मोठे नुकसान होणार आहे. परकीय भाषेतले ज्ञान मराठीत आणणे हि जमणार नाही आणि मराठीत नवे ज्ञान प्रसूत होण्यास कायमची अडचण निर्माण होणार आहे. सेमी इंग्रजी कितीही सोयीस्कर असले तरी ते एक तात्कालिक सुख असून आपण आपल्या मुळावर घाव घालण्यासारखे आहे. शिक्षकांनी याकडे लक्ष द्यावे असे माझे मत आहे.

9

Re: लुप्त होणारी मराठी भाषा

marathi bhasshikanich avarzun marathit bolun tasech itarana bolyala lavun ti tikavali pahije

10

Re: लुप्त होणारी मराठी भाषा

Inscript कळफलक वापरण्याबाबत माझा अनुभव - आपण इंग्लीश अक्षरांशी तुलना करत देवनागरी अक्षरं लक्षात ठेवली तर खूप कठीण होते. पण त्याऐवजी बोटं लक्षात ठेवा. उजव्या हाताला व्यंजनं, डाव्या हाताला स्वर. मधले बोट क,ख,ग,घ साठी, करंगळी चछजझ साठी, पहिले बोट पफबभ साठी इत्यादी. न पाहता टाईपिंग येणार्यांसाठी ही उत्तम सोय आहे. दोन आठवडे लागले सवय व्हायला -  हा सराव व्हायला संगणकावरील सर्व मराठी - हिंदी गाण्यांच्या फाईल्सची नावे देवनागरीत बदलली. प्रयत्न करून पहा. सुरवातीला पेनाने अक्षरं लिहीली होती, नंतर गरज भासलीच नाही.

11

Re: लुप्त होणारी मराठी भाषा

याविषयी 24 नोव्हेंबरच्या लोकसत्तामधील गिरीश कुबेर यांचे अन्यथा हे सदर वाचनीय आणि चिंतनीय आहे. तसेच हे लक्षात घेण्यासारखे आहे, की सुमारे 60-70 वर्षापुर्वीपर्यत विज्ञानाची भाषा जर्मन आणि ऑस्ट्रियन होती. तेव्हा पुढील 50 वर्षानंतर विज्ञानाची भाषा एखादी भारतीय भाषा वा चिनी भाषा नसेल कशावरून. हे सर्व आपल्यावरही अवलंबून आहे.

12

Re: लुप्त होणारी मराठी भाषा

yes its true .But first of all we will have to try our level best to create love n respect for MARATHI.