1

Topic: पाने का वळकटतात?

मी कुंडीत तुळशीची रोपे नर्सरीतून आणून लावली आहेत. पाण्याचा निचरा व्यवस्थित, पश्चिमेकडचे ऊनही व्यवस्थित सकाळी रात्री पाणी देते. पण त्याला नवीन पानं येतात त्यांची सुरळी झालेली असते. कीड काही दिसत नाही. पण त्यांचे कुपोषण होत असावे. जोमाने वाढण्यासाठी कशाचा पुरवठा करावा? घरी केलेले बायोकम्पोस्ट आणि नर्सरीतून आणलेली माती यांचे साधारण समसमान मिश्रण आहे. सल्फर, कॅल्शियम किंवा पोटॅशियम कमी पडत असावे का? कृपया जाणकारांनी माहिती द्यावी.

2

Re: पाने का वळकटतात?

शहरी शेती या विषयातले तज्ज्ञ असणारे, मराठी विज्ञान परिषदेचे निवृत्त व्यवस्थापकीय संचालक श्री. दिलीप हेर्लेकर यांनी आपल्या प्रश्नाला उत्तर दिले आहे. ते खालीलप्रमाणे आहे.

- प्रशासक (विज्ञानपीठ)

---------

आपण केलेल्या वर्णनानुसार, तुळशीला फॉस्फोरसची कमतरता जाणवत असावी असे दिसते. त्यासाठी कोबी, फ्लॉवर अथवा नवलकोलची पाने वा त्यांच्या पानांच्या देठांचे बारीक तुकडे कुंडीच्या पृष्ठभागावर पसरावेत. कालांतराने या उपचारांनी तुळशीला जाणवणारी फॉस्फोरसची कमतरता भरून निघायला हरकत नाही. आपला अनुभव कळवावा.

सर्वसाधारणपणे फुलझाडांची काळजी घेतली जाते. पण तुळशीच्या रोपाची काळजी घेतली जात नाही. (तुळशीच्या झाडाला फक्त पाणी घातले जाते.) तेव्हा आपण तुळशीच्या झाडाचीही काळजी घेता हे कौतुकास्पद आहे.

तुळस किंवा घरातील कुंड्यांत लावलेल्या रोपांना, आपण घरी आणलेल्या कोणत्याही प्रकारच्या भाजीच्या उर्वरीत भागाचे तुकडेही घालू शकता. त्याच बरोबर आपल्या घरातील निर्माल्यातली फुले (किंवा फ्लॉवरपॉटमधील वाळू लागलेली फुले) बारीक तुकडे करून कुंडीतील रोपांना घातल्यास तीही त्यांना पोषणमूल्ये पुरवू शकतात.

---------

3

Re: पाने का वळकटतात?

धन्यवाद, हेर्लेकर सर. उपाय सुरू केला.निर्माल्य तर मी कुस्करून रोजच घालते. साधारण किती दिवसांनी फरक अपेक्षित आहे? आणखी एक. टोमॅटोची झाडंही कुंडीत लावली आहेत. कळ्या आल्या. फुलंही आली आणि अचानकच पानांची टोकं पिवळी पडून झाड सुकायलाच लागलंय. हिरवी पानंही मरगळली आहेत. अगदी हातातोंडाशी आलेली स्थिती आहे. मी माती उकरून बघितली तर तिचं टेक्श्चर अगदी वाळूसारखं झालं होतं.भरपूर भिजून चिप्प होत. नवीन पांढर्या मुळ्या फुटतात तशा फुटलेल्या दिसत नव्हत्या.मुळाकडे खोड बारीक झालंय. पाण्याचा निचरा नीट होत नसावा. दुसरी माती मिसळली. बायोकम्पोस्ट मिसळलं.फरक पडतोय का बघू. फ्लॉवर-कोबीचा कचरा त्यालाही टाकते आहे. हा उपाय तुम्हीच मागे सुचवला होतात. पण तेव्हा झाडं उन्हात नव्हती अजिबातच. आता पश्चिमेचं ऊन लागेल अशी ठेवली आहेत. टोमॅटो, बीट, शेवंती पालक यांत सर्वप्रथम टोमॅटोच्या खोडावर पानांच्या पृष्ठभागावर पंढरी शुभ्र कापसाच्या तंतूसार्खी कीड पण दिसू लागली आहे.  उरलेल्या झाडांवरही थोड्या प्रमाणात तिथूनच पसरली. तुळस आणि गोकर्णीवर मात्र तिचा अजिबातच प्रादुर्भाव झाला नाहीये. सगळी रोपं अगदी चिकटूनच आहेत तरी. तर तिचा कसा बंदोबस्त करावा? अंग मोडून अंगाचा आकडा करत चालणार्या हिरव्यागार अळ्याही मला मातीत दोन तीन ठिकाणी परवापासून  दिसतायत. झाडावर दिसत नाहीत. औषध घालावं तर मातीतली गांडुळं सरसरून कुंडीबाहेर येतात. तीही मरतात. छोटे छोटे शंख तर असंख्य आहेत. तेही मग बाहेर येतात. काय करावं बुवा?

4

Re: पाने का वळकटतात?

श्री. दिलीप हेर्लेकर यांनी आपल्या प्रश्नांना पुढील उत्तरे दिली आहेत.

- प्रशासक (विज्ञानपीठ)

---------

(१)    आपण सुरू कलेल्या उपायावर सुमारे पाच दिवसांनी फरक अपेक्षित आहे. फरक न पडल्यास उपाय पुनः करत राहावे. त्याने कोणतीही हानी होत नाही.
(२)    पान पिवळे पडणे हे मातीत नत्राचे प्रमाण अपुरे असल्याचे दर्शवते. यासाठी मेथीच्या भाजीची पाने बारीक करून मातीच्या पृष्ठभागावर घालावीत. परिणाम चार-पाच दिवसांत अपेक्षित आहे.
(३)    अन्ननिर्मितीसाठी सूर्यप्रकाश अत्यावश्यक असल्याने, उत्पादन देणारी झाडे ही उन्हात असायलाच हवीत.
(४)    पांढरी कीड फडक्याने पुसावी. त्यानंतर त्या भागावर कडूलिंबाच्या पाल्याच्या रसाचा फवारा मारावा. अन्यथा आयुर्वेदिक औषधांच्या दुकानांत मिळणारी कडूलिंबाच्या पाल्याची भूकटी/चुर्ण पाण्यात मिळसून ते पाणी फवारावे. कीड न थांबल्यास हाच उपाय चार-पाच दिवसांनी परत करावा.
(५)    मातीतील शंख काढून टाकावेत. कारण त्यातून गोगलगायींची निर्मिती होते. गोगलगायी या खादाड असतात. वेळप्रसंगी त्या झाडही फस्त करतात.
(६)    रोजचे निरीक्षण आवश्यक.

---------

5

Re: पाने का वळकटतात?

धन्यवाद. आता दुसर्या टोमॅटोच्या झाडावर प्रयोग करून बघते. साबणाचे पाणी फवारून शंख जातील  का? इतरही उपाय करून बघते. दुपारी साडेबारा-एक नंतरचे ऊन सूर्य मावळेपर्यंत मिळते. तेवढे पुरेसे आहे का?

6

Re: पाने का वळकटतात?

श्री. दिलीप हेर्लेकर यांनी आपल्या प्रश्नांना पुढील उत्तरे दिली आहेत.

- प्रशासक (विज्ञानपीठ)

---------

(१) आपण नेहमीच्या पाण्याऐवजी साबणाच्या पाण्यात किटकनाशक मिसळून ते झाडांवर फवारू शकता. त्यामुळे किटकनाशक हे वाहून न जाता झाडावर अधिक प्रमाणात चिकटून राहते.
(२) आपण देत असलेले ऊन पुरेसे आहे.

---------