आपण आपल्या लिखाणातून काही मुद्दे मांडले आहेत. अशाच प्रकारचे विचार अनेकांच्या मनात येण्याची शक्यता आहे. त्यावर काही भाष्य करणं गरजेचं वाटलं, म्हणून हे लिहित आहे.
(१) मराठीमध्ये तांत्रिक शब्दांची भर पडत नाही हे आपलं म्हणणं योग्य नव्हे. किंबहूना अनेक इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द आहेत. अशा शब्दांची यादी परिषदेच्या याच संकतेस्थळावरील पहिल्या पानावरील ‘मराठी प्रतिशब्द’ या जोडणीद्वारे दिली आहे. तसेच नव्या शब्दांनाही हळु हळु प्रतिशब्द निर्माण होतही आहेत. मात्र अशा प्रकारचे प्रतिशब्द निर्माण करण्यात आणि या नव्या प्रतिशब्दांचा वापर करण्यात आपण प्रत्येकानेच पुढाकार घेण्याची गरज आहे. यातील सोपे-सुलभ शब्द कालौघात टिकून राहातील, बाकीचे नष्ट होतील.
आता प्रश्न एकच आहे की अस्तित्वात असलेल्या शब्दांचाही किती उपयोग केला जातो? उच्च शिक्षणासाठी वापरल्या जाणार्या मराठीत राहू द्या, पण नेहमीच्या मराठीतील अस्तित्वात असणार्या प्रतिशब्दांचा वापर मराठीत बोलताना किती जण करतात? साधं उदाहरण द्यायचं तर – वीजप्रवाह खंडीत झाल्यावर ‘दिवे गेले’ हे सहजपणे सांगता येत असतानाही ‘लाईट गेले’ असे म्हणणे किंवा संगणकाला कंप्युटर, संगणकाच्या पडद्याला स्क्रीन अशी भाषा वापरली जाते. एक सांगा, जर आपण जसं सहजपणे इंग्रजी शब्दांचा वापर मराठीतून बोलताना करतो, तसा मराठी शब्दांचा वापर इंग्रजी बोलताना करतो का? अशी मराठी मिश्रित इंग्रजी भाषा एखाद्या अमराठी व्यक्तीसमोर आपण बोलू का? मराठी बोलताना केला जाणारा इंग्रजी शब्दांचा वापर हा आपण आपल्यावर स्वतःहून लादून घेतला आहे – इंग्रजांनी किंवा इतर कोणी आपल्यावर लादलेला नाही. हे लक्षात घ्या की प्रा. जयंत नारळीकरांसारखे अनेक विख्यात मराठी वैज्ञानिक – ज्यांनी उभं आयुष्य संशोधनासाठी वेचलं आहे आणि ज्यांचा पदोपदी परदेशी वैज्ञानिकांशी (आणि पर्यायाने इंग्रजी भाषेशी) संबंध येतो – ते इंग्रजी शब्दांचा आधार न घेता, शुद्ध मराठीतून आपले विज्ञानावर आधारलेले विचार स्पष्टपणे मांडू शकतात. तात्पर्य, आपल्यालाच मराठी भाषेचा वापर करण्याची इच्छा नाही आणि म्हणूनच आपण या वैज्ञानिक मराठीपासून दूर जात आहोत.
(२) मराठी टंकलेखन करण्यास येणार्या अडचणींचा उल्लेख आपण केला आहे. आपल्याला इंग्रजी भाषेपेक्षा मराठीतून टंकलेखन करण्यापेक्षा सोपे वाटते. हाच प्रश्न एखाद्या जपानी, चिनी किंवा जर्मन, फ्रेंच भाषिकांना विचारा. त्याना काय त्यांच्या स्वतःच्या भाषेपेक्षा इंग्रजी भाषा टंकलेखनासाठी सोपी वाटेल? आपल्याला मराठीतील टंकलेखन अवघड वाटण्याची कारणे दोन – एक म्हणजे आपण संगणकाचे धडे गिरवले ते इंग्रजीतून – मराठीतून नव्हे. दुसरे कारण म्हणज आपण मराठी भाषेत टंकलेखन करण्यासाठी प्रयत्नच केलेला नसतो. आज टंकलेखनासाठी उच्चारावर आधारित अशा अनेक सोप्या पद्धती उपलब्ध आहेत. (यातील काही पद्धतिंचा उल्लेख या संकेतस्थळावरही केला आहे.) अशा पद्धतींचा वापर किती जण करतात? यांचा वापर सहजपणे करता येईल. फक्त या पद्धती जाणून घेण्यासाठी थोडेसे परिश्रम घेण्याची आवश्यकता आहे. आणि यापुढे जाऊन असेही विचारता येईल. या पद्धती जर अधिक सोप्या करायच्या तर त्या करणार कोण? आपल्या सर्वांपैकीच कोणी तरी.... त्यामुळे आपल्यापैकीच जे कोणी संगणक तज्ज्ञ असतिल व या प्रश्नाबद्दल ज्यांना आस्था असेल, त्यांनी यादृष्टीने गंभीरपणे प्रयत्न करण्यास हवा.
(३) मराठी भाषा लुप्त होऊ नये म्हणून मराठी विज्ञान परिषद करीत असलेल्या उपायाबद्दल आपण विचारणा केली आहे. मराठी भाषेतून विज्ञान प्रसार हे मराठी विज्ञान परिषदेचे एक उद्दिष्टच आहे. मराठी भाषेच्या संवर्धनाच्या दृष्टीनेही उपयुक्त ठरणारे परिषदेचे हे कार्य चार दशकांहून अधिक काळ अव्याहतपणे चालू आहे.
आता या तिसऱ्या मुद्द्यावर थोडंसं आणखी मतप्रदर्शन – मराठी भाषेबद्दल आपण व्यक्त केलेल्या भितीला जबाबदार कोण आहे? मराठी भाषिकच ना? आपल्या मुलाशी फक्त इंग्रजीतून संभाषण करणारे तसंच आपल्या मुलाला मराठी वाचता येत नाही किंवा वाचायला आवडत नाही हे अभिमानाने सांगणारे पालक हेच मराठी भाषेचे विरोधक (खरं तर मारेकरी) नव्हेत काय? दुसरी गोष्ट म्हणजे मराठी विज्ञान परिषदेने हे कार्य करावे अशी अपेक्षा करताना हे ही कृपया लक्षांत घ्यावे की मराठी विज्ञान परिषदेचे कार्य परिषदेच्या ज्या सुमारे सत्तर विभागांतील कार्यकर्त्यांद्वारे पार पडते, ते कार्यकर्ते कोण आहेत? हे सर्व तुमच्या आमच्यापैकीच काहीजण आहेत. त्यामुळे मराठीतून विज्ञान प्रसाराचे कार्य अधिक जोमाने करायचे असेल तर त्यात आपल्यासारख्यांच्या सहभागाचीही अत्यंत आवश्यकता आहे. स्पष्टंच बोलायचं तर ती फक्त परिषदेचीच नव्हे तर आपलीही जबाबदारी आहे.