1

Topic: भौतकशास्त्रातील संशोधनसाठी काय शिक्षण करू???

मी २०१८ मध्ये बारावीत ८२% गुण मिळवले आहेत व मला पुढे भौतिकशास्त्रात संशोधन करायचे आहे
त्यासाठी मी कुठले शिक्षण घेऊ व पुढे काय करू याविषयी मला मार्गदर्शन करावे ही विनंती

2

Re: भौतकशास्त्रातील संशोधनसाठी काय शिक्षण करू???

प्रिय सिद्धेश,

आपण विचारलेल्या प्रश्नाला प्रा. सुधीर पानसे यांनी खालील उत्तर दिले आहे.

- प्रशासक (विज्ञानपीठ)

------------------

भौतिक शास्त्रात, किंवा अन्य कोणत्याही विज्ञानाच्या शाखेत मुलभूत संशोधन करण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काही उत्तम शिक्षण-संस्था सध्या उपलब्ध आहेत. भारतात अनेक ठिकाणी 'आयसर' (IISER; Indian Institute of Science Education and Research); 'नायसर' (NISER; National Institute of Science Education and Research) या शैक्षणिक संस्था आहेत. मुंबई विद्यापीठात 'सीईबीएस' (CEBS; Center for Excellence in Basic Sciences) हे केंद्र आहे. या सर्व ठिकाणी गुणवत्ता असलेले विद्यार्थी निवडले जातात, व त्यांना पाच वर्षांच्या एकात्मिक मास्टर्स अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला जातो. मुलभूत विज्ञानात या विद्यार्थ्यांनी उत्तम संशोधक व्हावे असे शिक्षण त्यांना दिले जाते.
मात्र यासाठी बारावीच्या वर्षाच्या शेवटी प्रवेश परीक्षा द्याव्या लागतात. साधारण फेब्रुवारीत त्यासंबंधीचे निवेदन या संस्थांच्या संकेत स्थळांवर टाकले जाते. मार्चपर्यंत परीक्षेचा अर्ज भरावा लागतो. मे महिन्यात परीक्षा होतात. त्यातील गुणवत्तायादीवर प्रवेश मिळणार की नाही, व कोठे मिळणार हे ठरते. त्यामुळे बारावीच्या वर्षात असतांनाच याबाबतीत जागरूक रहायला हवे.
पण समजा बारावीच्या वर्षात ही माहिती नव्हती, आणि त्यामुळे विद्यार्थ्याची प्रवेश परीक्षा द्यायची राहिली, तर त्याची संधी कायमची गेली का? तर तसे नाही! बारावी उत्तीर्ण झाल्यावर पुढील वर्षीदेखील या परीक्षांना बसता येते. तेंव्हा आत्ता बारावी झालेल्या विद्यार्थ्यांनी काय करावे? आपल्या जवळच्या चांगल्या महाविद्यालयात बी.एस सी. साठी प्रवेश घ्यावा. यावर्षी वरील संस्थांच्या प्रवेश-परीक्षांसाठी कसून अभ्यास करावा. (या परीक्षा आय. आय. टी. च्या प्रवेश परीक्षेच्या पातळीच्या असतात.) वर्षाच्या शेवटी या एकात्मिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा द्याव्यात. त्यात यशस्वी झाल्यास उत्तम! (हे शिक्षण एवढे दर्जेदार आहे, की त्यासाठी एक वर्ष अधिक गेले तरी हरकत नाही.)
समजा, प्रवेश परीक्षेत यश मिळाले नाही, तरी काही बिघडत नाही. केलेला अभ्यास बी. एस सी. साठी उपयोगी होईल, व तिथे उत्तम यश मिळवून चांगल्या संस्थेत एम.एस सी. करण्यासाठी प्रवेश मिळेल. (एम. एस सी. ला प्रवेश कोठे घ्यावा हे त्यावेळी ठरवावे.)

------------------